पुणे : मला पहिला 'लतादीदी पुरस्कार' मिळाला, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. या पुरस्कारामुळे मी भारावून गेलो असून, माझ्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. हृदयनाथने मला आणि मी त्याला खूप संगीत ऐकवले. खरंतर हृदयनाथ मंगेशकरांमुळे माझी संगीताची समज प्रगल्भ झाली, अशा भावना ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त यंदापासून ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकरयांच्यावतीने सुरू करण्यात आलेला पहिला 'लतादीदी पुरस्कार' सोमवारी पं. सत्यशील देशपांडे यांना भारती हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी लता मंगेशकर यांच्या अंतिम इच्छेनुसार मंगेशकर कुटुंबीयांतर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कृतज्ञता निधीचा धनादेश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पं. सत्यशील देशपांडे म्हणाले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनी अनेक कवींच्या कविता जनमानसात लोकप्रिय केल्या. तसेच हृदयनाथांच्या संगीत क्षेत्रातील समर्पणाने अनेक पाश्चात्य वाद्यांना भारतीय चेहरा प्राप्त करून दिला. त्यांचे हे योगदान अतुलनीय आहे. यानिमित्त 'असेन मी नसेन मी' या लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला.