पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2019-20 ची पहिली प्रवेश यादी जाहीर झाली आहे. यात 55 हजार 342 अर्जांना मान्यता मिळाली आहे. तसेच प्रवेश मान्यता नाकारण्यात आलेल्या अर्जाची संख्या 4511 इतकी आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीअखेर एकूण प्रवेश क्षमता 1 लाख 41 हजार 139 एवढी असून यात भाग 1 नोंदणी केलेले प्रवेश अर्ज 84 हजार 593 इतकी आहे. तर संगणकीकृत मान्यता झालेल्या प्रवेश अर्जांची संख्या 24 हजार 740 आहे. अशी माहिती 11 वी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष व प्रभारी शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी दिली.
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे कामकाज पुणे, मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात 7 मार्च पासून सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया 2019 -20 करिता ऑनलाईन केंद्रीय पहिल्या फेरीकरिता प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. 3 जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 भाग 2 चा प्रवेश अर्ज भरलेला आहे त्याची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अद्याप ज्या 4511 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 1 मार्गदर्शन केंद्रावरुन मान्य करुन घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन 4 जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत मान्य करुन घ्यावा. तसेच त्याच दिवशी अर्जाचा भाग 2 (पसंतीक्रम) भरावा. भाग 2 (पसंतीक्रम) न भरल्यास असे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीस पात्र धरले जाणार नाही.
प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा भाग 2 (पसंतीक्रम) 4 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करुन द्यावा. अशी सुचना प्रवेश नियंत्रण समितीच्यावतीने देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंची अधिक माहिती www.dydepune.com व इयत्ता 11 वी आॅनलाईन प्रवेशाच्या http://pune.11thadmission.net संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.