पुणे : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे यावर्षीपासून साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार दिला जाणार असून हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष.मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक 17 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, असे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये यांनी कळविले आहे.
प्रकाशक संघातर्फे तसेच 2017 मधील उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. या पुरस्कार विरतरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस भूषविणार असून प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा. द.मा. मिरासदार अनुभवकथन करणार आहेत. यावेळी प्रकाशकांकरीता फायदेशीर असलेल्या युनिकोड टाईपसंबंधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख विवेचन करणार आहेत. रविवार दिनांक 17 जून 2018 रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बर्वे आणि उपाध्ये यांनी केले.