पुणे : पहिल्या लग्नामधून घटस्फोट झालेला नसतानाही कुमारिका असल्याचे भासवत एका पोलिसाशी दुसरे लग्न केलेल्या पत्नीपासून पतीला सुटका मिळाली. पत्नीला संधी मिळूनही तिने बचाव प्रकरणात समाविष्ट होण्याकरिता कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तिच्या वतीने स्वत:ची किंवा इतर कुणाचीही साक्षनोंदविली गेली नाही. त्यामुळे पतीची फसवणूक केल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने पत्नीविरूद्ध एकतर्फी निकाल देत घटस्फोट मंजूर केला. बारावे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) के.एस नावंदर यांनी हा आदेश दिला.
राहुल आणि सीमा (नाव बदललेले) यांचे लग्न 4 जून 2021 ला आळंदी येथे झाले. राहुल पोलीस दलात काम करतात. त्यांचे पहिले लग्न झाले होते. ते एका मुलीचे वडील व विधूर होते. मुलीसाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुल यांनी सीमाला पूर्वीचे लग्न, मुलगी, त्यांचे आई-वडील याविषयी पूर्ण माहिती दिली होती. लग्नानंतर नऊ दिवसातच ती कारण नसताना भांडणे करून निघून गेली. तिला शोधल्यानंतर ती आंबेगाव न-हे येथे सापडली. पत्नी मुलीलाही वाईट वागणूक द्यायची. नंतर सीमाने राहुलपाशी वेगळे राहाण्याचा तगादा लावला. पत्नीने पतीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पतीला एक धक्कादायक बातमी कळाली की त्यांच्या पत्नीचे सेंट्रल रेल्वेत काम करणा-या व्यक्तीशी पहिले लग्न झाले आहे आणि त्यांचा घटस्फोट झालेला नाही. तिने पहिल्या नव-याच्या कुटुंबावरही घटले दाखल केले आहेत. त्यामुळे राहुल यांनी पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी अँड नीता भवर यांच्यामार्फत अर्ज केला. पत्नीने न्यायालयात हजर राहून तिचा बचाव सादर केला नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश देत पतीने दिलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.