पुणे : शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करीत असतानाच, शनिवारी (दि. १४) कोरोनाच्या डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे़ संबंधित रुग्णाचा अहवाल शनिवारी महापालिकेकडे आला असला, तरी संबंधित व्यक्तीला या विषाणूची बाधा एक महिन्यापूर्वीच झाली असून, तो आत्ता कोरोनामुक्त आहे़
शहरात आजही आठ ते नऊ हजारकोरोना संशयितांची तपासणी होत आहे. यात कोरोनाबाधित व्यक्तीच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे दाखल झाल्यावर त्याचा प्रत्यक्ष अहवाल महापालिकेकडे येईपर्यंत काही दिवसाांचा कालावधी जातो. मात्र, या घटनेत संबंधित रुग्ण कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या रुपातील विषाणूने बाधित असल्याचा अहवाल महापालिकेकडे शनिवारी आला.
‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेला ६२ वर्षीय रुग्ण हा हडपसर परिसरातील आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यावर कुठलीच लक्षणे नसल्याने तो घरीच विलगीकरणात होता. यादरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची कोरोना तापसणी करण्यात आली असून या सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
चौकट
भीतीची गरज नाही
“डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून आला असला, तरी त्याला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यास घरीच विलगीकरणाचा सल्ला दिला गेला होता. आज त्याचा अहवाल आल्यानंतर त्यास ‘डेल्टा प्लस’ ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्याच्या संपर्कातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला नसून बाधा झालेली ६२ वर्षीय व्यक्तीही पूर्णत: ठणठणीत आहे. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’चा शहरात शिरकाव झाला असला, तरी घाबरून जाऊ नये. नियमित मास्कचा वापर करावा व योग्य ती खबरदारी घ्यावी.”
-डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे मनपा.