लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतच्या लसीकरणाची आवश्यक तयारी पूर्ण केली असली तरी पहिल्या टप्प्यात केवळ २१ ते २२ हजार सेवकांनाच लस उपलब्ध होणार आहे. उर्वरित आरोग्य सेवकांना लसीच्या दुसऱ्या डोस पुरवठ्याची वाट पहावी लागणार आहे़
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी सांगितले की, केंद्राच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोविड-१९ ची लस दिली जाणार आहे़ याकरिता महापालिकेकडे सरकारी रूग्णालयातील ११ हजार ५७९ जणांनी तर खाजगी रूग्णालयातील ४५ हजार २६५ जणांनी नोंदणी केली आहे़ मात्र महापालिकेला लसीचे ६० हजार डोस मिळाले असून यातील १२ हजार डोस हे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. यामुळे १० टक्के ‘वेस्टेज’ गृहीत धरून सद्यस्थितीला पालिकेकडे ४२ ते ४३ हजार डोस आहेत. परिणामी नोंदणी केलेल्या शहरातील आरोग्य सेवकांपैकी निम्म्याहून कमी जणांनाच पहिल्या लस पुरवठ्यातील लस उपलब्ध होणार आहे़
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्राप्त लसीमध्ये संबंधित लाभार्थ्यांना २८ दिवसांच्या अंतराने दोन वेळा डोस द्यावयाचा आहे. त्यामुळे प्रारंभी देण्यात येणाऱ्या २१ ते २२ हजार आरोग्य सेवकांना झालेल्या लस पुरवठ्यातीलच दुसरा लसीचा डोस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे़ यामुळे उपलब्ध लसीपैकी निम्या लस महापालिकेच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणार आहेत, असे डॉ. भारती म्हणाले.
महापालिकेची ८ लाख लस डोस साठवणूक करण्याची क्षमता असून, याकरिता महापालिकेकडे आपल्या विविध रूग्णालयांमध्ये ७० आय़एलआर (५ हजार लिटर) व ४० डीपफ्रिजर आहेत़ १६ जानेवारीला आठ लसीकरण केंद्रांवर दिवभरात प्रत्येकी शंभर म्हणजे एकूण आठशे जणांना लसीकरणाचे ‘एसएमएस’ पाठविले जाणार आहेत़ या सर्वांना लस देण्याची प्रक्रिया पार पाडतानाच प्रत्येकाला लसीकरणानंतर अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे़