सोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात गळीत होणाऱ्या उसाला प्रतिटन २७५० रुपये तर खोडवा ऊसपिकाला प्रतिटन २८५० रुपये पहिली उचल देणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.आज सोमेश्वर कारखान्यावर झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सोमेश्वर कारखान्याने २५५० रुपये तर खोडव्यासाठी २६५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला होता. मात्र, राज्यातील इतर कोणत्याही कारखान्याच्या दरात कमी पडणार नाही. यामुळे आज पुन्हा संचालक मंडळाने आपला निर्णय बदलून जादा उचल जाहीर केली. अध्यक्ष जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की पहिली उचल २७५० पैकी ऊस गाळपास येताच २४०० रुपये प्रतिटन तर खोडव्यासाठी २५०० रुपये प्रतिटन प्रमाणे पैसे अदा करणार आहोत. तर साखर आयुक्तांच्या परवानगीने उर्वरित रक्कम सभासदांना अदा करणार आहोत. सोमेश्वर कारखाना सभासद आणि कामगार यांच्या सहकार्यामुळे उत्तमरीत्या सुरू असून मूठभर लोकांकडून सोमेश्वरच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या सर्वच कारखान्यांना उसाची कमतरता असल्याने उसाची पळावापळवी सुरू आहे. आम्ही संचालक मंडळ इतर कारखान्यांच्या बरोबरीत कोठेही कमी पडणार नसल्याची हमी वेळोवेळी सभासदांना देत होतो. यावर सभासदांनी विश्वास ठेवला. आजपर्यंत सोमेश्वर कारखान्याने ३ लाख २८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. ११.१७च्या सरासरी साखर उताऱ्यानुसार ३ लाख ६३ हजार पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. आपल्या कारखान्याचे चालू हंगामात ७ लाख टनापर्यंत ऊस गाळापाचे उद्दिष्ट आहे. यासाठी सभासद, कामगार, वाहतूकदार, ऊसतोडणी मजूर या सर्वांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘सोमेश्वर’ची २७५० रुपये पहिली उचल अखेर जाहीर
By admin | Published: January 06, 2017 6:25 AM