वडगाव कांदळी : पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील उत्कृष्ट कामकाजासाठी २०२१-२२ साठीचे पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे देण्यात आले. पुणे जिल्ह्यात जुन्नर पंचायत समितीचा उमेद व ग्रामपंचायत विभागात प्रथम क्रमांक मिळाला तर पंचायत समितीच्या कामात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
अजित पवार म्हणाले, कोरोना संकटात पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम, हॅप्पी न्यू इयर ,प्रोसेस मॅपिंग, बाल आरोग्य तपासणी मोहीम, विभागीय चौकशी पुस्तिका, ग्राम परिवर्तन अधिनियम, फिरते पशुचिकित्सालय आदी विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी मानसी कुचिक, किसन मोरे, उषा अभंग, कक्ष अधिकारी संदीप घायवट, पशुधन विकास अधिकारी डॉ.महेश शेजाळ, ग्रामपंचायत विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष भुजबळ ,विस्तार अधिकारी जयश्री बेनके, अंकुश खांडेकर यांनी स्वीकारला.