राजेवाडी : आम्ही आमच्या गावात सुखाने गुण्यागोविंदाने राहत असून, अर्धीभाकरी खाऊन खूश आहोत साहेब. विमानतळाच्या अगोदर आम्हाला गोळ्या घाला आणि नंतरच विमानतळ करा, असे पारगाव येथील अनिता रोकडे यांनी विमानतळविरोधी भूमिका आक्रमकपणे पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांच्यापुढे मांडली.विमानतळाचे अजून सहा आठवडे सूक्ष्म सर्वेक्षण होणार असून शेतकऱ्यांनी विरोध करू नये, यासाठी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी जेजुरी व सासवड येथील पोलीस बंदोबस्तात पारगाव येथे आले होते.या वेळी तहसीलदार सचिन गिरी यांनी विमानतळासाठी वाऱ्याचा वेग, हवेचा दाब, टेकड्या, डोंगर, गावठाण यांचे सूक्ष्म सर्वेक्षण दीड महिना होणार आहे. विरोध करू नका, सर्वेक्षणात वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण या गावांचा समावेश करण्यात आला आहे. चाकणमधील नागरिकांची विमानतळाची मागणी होत आहे, त्यामुळे पुरंदरमधील शेतकऱ्यांनी विमानतळास विरोध करू नका, असे आवाहन तहसीलदार सचिन गिरी यांनी केल्यानंतर चाकणलाच विमानतळ जाऊ द्या, अशी मागणी सर्वांनी केली.या वेळी गणेश मेमाणे, मंडलाधिकारी संजय बडदे, पोलीस निरीक्षक गौड, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, वसंत मेमाणे, विठ्ठल मेमाणे, हरिभाऊ मेमाणे, अनिल मेमाणे, माजी सरपंच जितेंद्र मेमाणे, अनिता रोकडे, विलास कडलग, शिवाजी मेमाणे, दीपक मेमाणे, पोपट मेमाणे यांनी विमानतळविरोधी आक्रमक भूमिका मांडली. आजची वस्तुस्थिती शासनस्तरावर आजच पोहोचवणार असल्याचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितल्यानंतर बैठक संपली. (वार्ताहर)- आमच्या भागात पुरंदर उपसाच्या पाण्याने शेती फळबागा फुलल्या आहेत. आम्हाला विमानतळाची गरज नाही. मंत्र्याला विमानाची गरज आहे, विमानतळ मंत्र्यांच्या वीर परिंचे भागात करा, अशी नंदा टिळेकर यांनी भूमिका मांडली. सर्वेक्षण करायला येऊ नका, आल्यास आम्ही सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा सुगंधा खेडेकर यांनी दिला.विमानतळास इंचभर जमीन देणार नसल्याचे अनेक वेळा लेखी कळवले असून, आमची भूमिका ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक व एअरपोर्ट अॅथॉरिटीचे अधिकारी यांना गावात बोलावल्याशिवाय आम्ही सर्वेक्षण होऊ देणार नाही.- सर्जेराव मेमाणे, सरपंच (पारगाव)
आधी गोळ्या घाला, मगच सर्वेक्षण करा
By admin | Published: December 31, 2016 5:29 AM