पुणे : ‘अनलॉक’ नंतरचे पहिले सतरंगी कलाप्रदर्शन चित्रप्रेमींना अनुभवता येणार आहे. लॉकडाऊन काळात शालेय कामकाज सांभाळत चित्रकार म्हणून कलाक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कला शिक्षकांच्या कलाकृतींचे रंगसप्तक हे प्रदर्शन दि. 10 ते 12 जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजिले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अरुण लाड आणि चित्रकार सुधाकर चव्हाण उपस्थित राहाणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान रसिकांना पाहता येईल.
’रंगसप्तक’ हा क्रियाशील कला शिक्षकांचा समूह आहे. प्रदर्शनात निसर्ग चित्रे, रचनाचित्रे, अमूर्त शैलीतील चित्रे गड-किल्ल्यांची चित्रे, सर्जनात्मक चित्रे अशा विविधरंगी कलाविष्कारांचे यांचे दर्शन घडते. यामध्ये सात कला शिक्षकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती अनुभवायला मिळणार आहेत. त्यामध्ये दिलीप पवार, हरेश पैठणकर, संदीप शेटे, मोहन चार्य, राजेंद्र अवधूतकर, मोहन देशमुख, हनुमंत तोडकर यांचा समावेश आहे.
-----------------------------------------------