भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी ८ आॅगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार असून, दि. १५, २२ व २९ रोजी पुढील तीन सोमवार आले आहेत. भीमाशंकरमध्ये श्रावण महिन्याबरोबरच महाशिवरात्र, चातुर्मास, त्रिपुरीपौैर्णिमा या काळात यात्रा भरते. यातील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते. या यात्रेचे नियोजन भीमाशंकर देवस्थान ट्र्रस्ट करत असते. घोडेगाव व राजगुरुनगर पोलीस स्टेशनने चोख पोलीस बंदोबस्त नेमला आहे. सोमवारप्रमाणेच शनिवारी व रविवारीदेखील जादा पोलीस नेमण्यात आले होते. वाहनतळपासून मंदिरापर्यंतच्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे १५० पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. खेडचे उपविभागाीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाली सर्व बंदोबस्त नेमण्यात आला आहे. एसटी महामंडळाने ४५ जादा गाड्या ठेवल्या आहेत. तसेच २३ दररोजच्या बस भीमाशंकरकडे येणार आहेत. वाहनतळ ते पार्किंगसाठी २५ मिनीबस ठेवल्या जाणार आहेत. विविध आगारांतूनही श्रावणी सोमवारनिमित्त जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. देवस्थाननेही यात्रेनिमित्त तयारी केली असून यात्रेकरूंना रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये यासाठी दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. (वार्ताहर)
पहिला श्रावणी सोमवार; भीमाशंकरला होणार गर्दी
By admin | Published: August 08, 2016 1:33 AM