पौड: सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी अनंत अडचणी येत आहेत. त्यात आदिवासी वस्तीवरील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक समस्या येत आहेत. अशा वेळी मुलांच्या अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट होऊन त्यांना दिलेला अभ्यासक्रम समजावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या सर्व गोष्टींचा विचार करून कळमशेत शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संजीव बागुल यांनी 'स्मार्ट अभ्यासिका’ हा उपक्रम कळमशेत येथील आदिवासी वस्तीवर सुरू केला आहे.
या अभ्यासिकेत चैतन्य साॅफ्टवेअर टेक्नॉलॉजीजने तयार केलेल्या अभ्यास संचाच्या सहाय्याने व रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी ॲन्ड्राॅईड टीव्ही व अंगणवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत पाठ्यक्रमयुक्त दृकश्राव्य साॅफ्टवेअर उपलब्ध केले आहे.या उपक्रमाद्वारे मुलांना शाळा बंदच्या काळात वस्तीवर जाऊन स्वयंसेवक व शिक्षकांमार्फत दररोज ही अभ्यासिका चालवली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचे मानधन इन्स्टिट्यूट फॉर वुमेन आंत्रप्रेनाॅरियल डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत आणि बागुल व राठोड यांच्या वेतनातून दिले जात आहे.
असा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी कळमशेत ही तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. आपल्या घराच्या जवळच ही अभ्यासिका सुरू केली असल्याने मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. शिवाय, पालकांना आपली मुले वस्तीमध्येच सुरक्षितपणे शिकत असल्याचा आनंद मिळत आहे. गणित व इंग्रजीसारखे अवघड वाटणारे विषय या अभ्यासिकेमुळे मुलांना सोपे वाटत आहेत.
कळमशेत येथील आदिवासी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी कोरोनाकाळात शिक्षक बागुल यांनी मागील वर्षी सर्व मुलांना टॅब वाटप, तसेच अभ्यास आपल्या दारी (अभ्यासाची वाडी) असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. वेगवेगळे विविधांगी उपक्रम राबविणारी कळमशेत ही शाळा तालुक्यात नेहमी अग्रेसर असून, सर्व शिक्षकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरली आहे.
माझ्या आदिवासी बांधवांची मुले अशा संकटात शिक्षणात मागे राहू नयेत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ती शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावीत यासाठीच ‘स्मार्ट अभ्यासिका’ हा उपक्रम राबविला आहे.
-संजीव माधव बागुल
(राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक)
शाळा-कळमशेत, ता. मुळशी]
कळमशेत येथील कातकरी वस्तीवर स्मार्ट अभ्यासिकेत रममाण झालेली मुले.