भोर : ‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.केंजळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज वितरण कंपनीची वीज न वापरता सौरऊर्जेवर निर्माण होणारी वीज वापरली जाते. त्यासाठी नेट मीटरची परवानगी मिळाली आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यालय, गावातील स्ट्रीट लाइट व गावातील पाणीपुरवठा करणारे पंपसेट यांच्यासाठीदेखील सौरऊर्जा वापरली जाणार आहे. त्यासाठी गावातील सार्वजनिक ऊर्जेस पर्याय म्हणून सौर पॉवर प्लान्ट उभारण्यात येणार आहे. दिवसा सौरऊर्जा निर्माण करून नेट मीटरद्वारे एमएसइबीला देऊन त्याबदल्यात रात्री स्ट्रीट लाइटसाठी विजेचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद निधी अथवा जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतले जाणार असून केंजळ हे तालुक्यातील पहिले सौरग्राम होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.या वेळी ग्रामसभेत गावातील ११ ग्रामस्थांनी वैयक्तिक आपल्या घरांवर सौर पॉवर पॅक बसविण्याची तयारी दर्शवली आहे. लोकांच्या मागणीनुसार भविष्यात कौलारू घरांवरही कमी वजनाचे सौर पॉवर पॅक बसवले जाणार असल्याचे ग्रामसेवक एम. व्ही. लेंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)
केंजळ गाव होणार पहिले सौरग्राम!
By admin | Published: August 29, 2016 3:24 AM