पुणे: शहरातील सर्व व्यवहार आधी सुरळीत होऊ द्या, मगच आम्ही आमची दुकाने सुरू करू अशी भूमिका पुणे सराफ असोसिएशनने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले असून त्यात सराफ वव्यावसायिकांच्या सरकारकडून काही अपेक्षा असल्याचे नमूद केले आहे. रांका म्हणाले, कर्ज घेतलेल्यांना आरबीआयने तीन महिने हप्ते जमा न करण्याची मुभा दिली आहे, मात्र ती अपुरी आहे. किमान ६ महिन्यांची सवलत द्यावी व नंतरही धकीत हप्ते टप्पे करून जमा करण्याची मूभा द्यावी. कोरोना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद होते. त्यामुळे लोकांजवळ खरेदीसाठी पैसे नाहीत, त्याचा विचार करून सरकारने पुढील किमान ३ महिने जीएसटी पुर्ण माफ करावा.कामगारांबाबत बोलताना रांका म्हणाले, १०० पेक्षा कमी कामगार असतील व त्यांच्यापैकी ९० टक्के जणांचे पगार १५ हजारपेक्षा कमी असतील तर अशा आस्थापनांमधील त्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा कोरोना लॉकडाऊन काळातील हप्ता सरकार जमा करणार आहे. हा निर्णय अन्य आस्थापनांवर अन्याय करणारा आहे. सरकारने पगाराची तसेच १०० कामगारांची अट काढून टाकावी व सर्वच कामगारांचा या काळातील भविष्य निर्वाह निधी जमा करावा. सरकारच सध्या डिजिटल ऑनलाईन पेमेंटचा आग्रह धरत आहे. मात्र अशा आर्थिक व्यवहारांवर बँक वाढत्या दराने कमिशन घेते. पुढील काही महिन्यांसाठी हे कमिशन बंद करावे असे रांका म्हणाले. बँकामधील विशिष्ट रकमेच्या ठेवींनाच सरकार सुरक्षा देते. असे न करता सर्व ठेवींना सरकारने सुरक्षेची हमी घ्यावी अशीही मागणी रांका यांनी केली.सरकारने एका गल्लीतील केवळ ५ दुकाने खुली करावीत असा अनाकलनीय निर्णय घेतला. मद्यविक्री करणारी दुकाने खुली केली. हे सगळे न समजणारे आहे अशी टीका रांका यांनी केली. आमच्या सराफ संघटनेचे पुणे पिंपरी-चिंचवड सह १७०० सदस्य आहेत. त्यामुळेच आम्ही आधी पुणे सुरळीत सुरू करा, नंतरच आमची दुकाने सुरू करू असा निर्णय घेतला असल्याची व तसे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले असल्याची माहिती रांका यांनी '' लोकमत '' शी बोलताना दिली.
आधी पुणे शहर सुरळीत सुरू करा, त्यानंतरच आम्ही दुकाने सुरू करू : पुणे सराफ संघटनेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 6:13 PM
सरकारने एका गल्लीतील केवळ ५ दुकाने खुली करावीत असा अनाकलनीय निर्णय घेतला..
ठळक मुद्देव्यावसायिकांच्या सरकारकडून काही अपेक्षा असल्याचे नमूदबँकामधील सर्व ठेवींच्या सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी