पुणे : पुणे महापालिकेची मराठी भाषा संवर्धन समिती आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन २० ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रसह विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी यांचे विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, कवी संमेलन, आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेले पुस्तकांचे प्रकाशन, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन आणि कथाकथनही या संमेलनात होणार आहेत.
संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची, तर स्वागताध्यक्षपदी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची निवड करण्यात आली आहे. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन हे संमेलनाचे निमंत्रक आहेत. या संमेलनात २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुस्तक प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, चित्र आणि छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त पृथ्वीराज बी. पी., सहकार आयुक्त दीपक तावरे, निवृत्त अधिकारी अनिल कवडे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टीपर्पस क्रेडिट सोसायटीचे सुनील जाधव, डॉ. राजाराम घावटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, निवृत्त अधिकारी विश्वास पाटील, नॅशनल बुक ट्रस्ट विश्वस्त राजेश पांडे उपस्थिती असणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, स्वागताध्यक्षपदी, पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.