यावेळी उपस्थित भाविक भान हरपून विठूनामाचा गजर करीत होते. टाळ्यांचा कडकडाट, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत स्वागत करण्यात आले. या वेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, उपनगराध्यक्षा वसुधा आनंदे, संत सोपानदेव महाराज पालखी सोहळाप्रमुख त्रिगुण गोसावी यांनी भाविकांसोबत फुगडी खेळत सोहळ्याचा आनंद लुटला.
सासवड येथून संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान प्रतीकात्मक स्वरूपात पार पडल्यानंतर परंपरेनुसार आज दि. १३ रोजी पायी वारीचा सहावा दिवस आहे. आणि दुपारचा विसावा बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे असतो. त्यामुळे वारी बंद असली तरी वारीतील विविध उपक्रमांची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मंदिरातच प्रतीकात्मक स्वरूपात मेंढ्यांचे रिंगण घेण्यात आले.
मंदिरात पहाटे काकडा आरती, महापूजा आणि सकाळी संगीत भजन पार पडल्यानंतर मंदिरात पंचपदी करून संतांचा अभंग घेण्यात आला. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका आणि गळ्यात टाळ मृदंग घेऊन हरिनामाचा गजर करीत मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली. तसेच हरिनामाच्या जयघोषात मेंढ्यांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या वेळी भाविकांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
आमदार संजय जगताप, उपनगराध्यक्षा वसुधा आनंदे, माजी उपनगराध्यक्ष संजय गणपत जगताप, संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, गणेश जगताप, सखाराम लांडगे, सुधाकर गिरमे त्याचप्रमाणे इतर मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. आमदार संजय जगताप आणि त्रिगुण गोसावी यांनी फुगडी खेळल्यानंतर उपस्थित सर्वानीच फुगडी खेळून सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला.
सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव मंदिरात पायी वारीतील परंपरेचे मेंढ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी आमदार संजय जगताप यांच्यासह उपस्थित मान्यवर.