२५ वर्षात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:11 PM2019-08-22T16:11:50+5:302019-08-22T16:12:42+5:30
स्थायी समितीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्या नावाची प्रदेश काँग्रेसने शिफारस केली होती
पुणे: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. स्थायी समितीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्या नावाची प्रदेश काँग्रेसने शिफारस केली होती . मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे केले. त्यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर माघार कोण घेणार यावर चर्चा सुरू असताना झुरंगे यांनी माघार न घेण्यास नकार दिला. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांनी नावावर एकमत न झाल्याने सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनानंतर बावडा गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील निवडुण आल्या. यामुळे स्थायी समितीवर काँगे्रसकडून अंकिता पाटील यांचे नाव चर्चेत होते. अंकिता या कुठल्या समितीच्या सदस्य नसल्याने त्यांनाच संधी मिळेल हे निश्चित होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अंकिता पाटील यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांची भेट घेऊन दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे केले. झुरंगे हे सध्या कृषी समितीवर सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या दहा समित्या आहेत. एकावेळी एकाच समितीचे सदस्य होता येत असल्याने झुरंगे यांचा राजीनामा बुधवारीच तडकाफडकी मंजुर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आली होती.