बारामती : जैनकवाडी परिसरातील नागरिकांना नेहमीच भलामोठा अजगर फिरताना दिसत होता. अजगर दिसला, की येथील रहिवाशांची भीतीने गाळन उडायची. तातडीने सर्पमित्रांना संपर्क साधला जायचा; परंतु सर्पमित्रांनाही या अजगराने दोन-तीन वेळा चकवा दिला. अजगर सापडतच नाही म्हटल्यावर रविहासीदेखील भीतीच्या सावटाखाली होते. मात्र येथील एका युवकाला हा अजगर दिसला. त्याने तातडीने सर्पमित्रांना याबाबत माहिती कळवली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी या अजगराला पकडल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बारामती शहराच्या जवळ भलामोठा अजगर पकडण्याची ही पहिलीच वेळ. ‘रॉक इंडियन पायथन’ जातीचा सुमारे ८ ते ९ फूट लांबीचा अजगर मागील अनेक दिवसांपासून जैनकवडी परिसरात फिरत असल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले होते. जवळच असणाऱ्या भिगवण-बारामती रस्त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच परिसरातील रहिवाशीदेखील या अजगरामुळे भीतीच्या सावटाखाली होते. सोमवारी सायंकाळी ७च्या सुमारास अमित यादव हा युवक भिगवण रस्त्याने येत होता. बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या जवळच हा भलामोठा अजगर गारव्याला पहूडलेला आढळला. अमितने तातडीने बारामती शहरातील सर्पमित्रांशी संपर्क साधला. दोन-तीन वेळा चकवा दिल्याने सर्पमित्रांनीही तातडीने अजगर पडकण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अजगराचा आकार पाहून सर्पमित्रदेखील चकित झाले. मात्र सर्पमित्रांचीही अजगर पकडण्याची पहिलीच वेळ असल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अजगराला सुरक्षित पडकण्यात सर्पमित्रांना यश आले. यानंतर सर्पमित्रांनी तातडीने बारामती वनविभागाशी संपर्क साधून अजगर पकडल्याची कल्पना दिली. मंगळवारी (दि. १०) वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी पंचनामा केला. यानंतर सर्पमित्र अमोल जाधव, मांढरे, अक्षय झगडे, श्रीनाथ चव्हण, सुहास भोसले, कल्पक गाढवे, संग्राम थोरात, राहुूल सूळ, वनकर्मचारी डी.एम. वाघमोडे, आर.डी. काळोखे आदींच्या उपस्थितीत अजगराला सुरक्षित निर्जनस्थळी सोडण्यातआले. (प्रतिनिधी)अजगर हा पूर्णपणे बिनविषारी साप असून, त्याला इंग्लिश मध्ये ‘रॉक इंडियन पायथन’ असे म्हणतात. याची सरासरी लांबी १५ ते १८ फूट असते. याच्या स्थुल शरीरावर गुळगुळीत चमकणारे खवले, रंग राखाडी, पांढरट किंवा फिकट तपकिरी असतो. शरीरावर गडद तपकिरी ठिपके असतात. याचे मुख्य खाद्य लहान असताना बेडूक, सरडे, उंदीर, पक्षी आणि मोठा झाल्यावर ससा, हरिण, बकरी असे मोठे प्राणी याचे खाद्य आहेत, अशी माहिती सर्पमित्र अमोल जाधव यांनी दिली.
बारामतीत प्रथमच आढळला ‘अजगर’
By admin | Published: January 11, 2017 1:54 AM