पुणे : परिसंवाद, व्याख्यान, अनुभवकथन, माहितीपट, चित्र प्रदर्शन अशा उपक्रमांची मेजवानी असलेल्या देशातील पहिल्याच यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.कर्दळीवन सेवा संघाने यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यातील अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन करावे; या उद्देशाने हे संमेलन योजले आहे. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत. सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म, चित्र प्रदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा महोत्सवात होणार आहेत. देशात प्रथमच अशा प्रकारचे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. लेखक, परिक्रमार्थी, यात्रा- परिक्रमा आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी यात्रा परिक्रमांची माहिती, परिक्रमार्थींच्या अनुभवांची देवाणघेवाण, परिक्रमांचे लघुचित्रपटांमधून दर्शन आणि त्यातून एक उत्कट अनुभूती असे या संमेलनाचे स्वरूप आहे. अधिकाधिक रसिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.या संमेलनातून निमाड अभ्युदय या भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमा किनारी स्थापन केलेल्या गरीब मुलांच्या शैक्षणिक आणि निवासी प्रकल्पासाठी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या रसिकांच्या सहकार्याने ५ लाख रूपयांचा सामाजिक निधी अर्पण केला जाणार आहे.
देशात प्रथमच यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन; २८ जानेवारीला पुण्यात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 1:36 PM
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे.
ठळक मुद्देडॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन कर्दळीवन सेवा संघाने आयोजित केले आहे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन