पुणे : सध्या तरुण मोबाइलच्या विळख्यात सापडली असून, इंटरनेटग्रस्त झाली आहेत. त्यामुळे नैराश्य, अस्थिरता आणि इतर आजार त्यांना होत आहेत. यावर उपचार करण्यासाठी आता पुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू होत आहे. यामध्ये ई-व्यसन, ब्रेन फिडबॅक, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये इंटरनेट व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशातील तिसऱ्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील अभिनव चौकातील विशाल सह्याद्री सदन येथे होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित असतील, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली.
डॉ. दुधाणे म्हणाले, भारतामध्ये दिल्ली आणि बंगळुरू येथे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे पुण्यात हे केंद्र सुरू होत आहे. मोबाइल, इंटरनेटमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय या केंद्रात केले जाणार आहेत. युवकांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिवसेंदिवस इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत असल्याने या नवीन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.२७ दिवस उपचार करणारडॉ. आमोद बोरकर म्हणाले, ‘‘एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीपासून २७ दिवस दूर ठेवले तर ती व्यक्ती त्या गोष्टीला विसरते. त्यामुळे आम्ही २७ दिवस संबंधितांना मोबाइलपासून दूर ठेवून उपचार करणार आहोत.’’