पुणे : मतदान केंद्रातील कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी नवीन मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. त्या अॅपचा वापर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संपर्क ठेवणे सोपे होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधिकारी जय जाधव उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी निवडणुका सुरळीत होण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. निवडणुकीसाठी १८ हजार २०६ अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ६ हजार पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर नि:पक्षपाती वातावरणात आणि सुरळीतपणे पार पडतील, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी. ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी पाऊस झाल्यास मतदानामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणे होणार आहेत. जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर १९६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उमेदवारांचा वेळ वाचावा यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज आॅनलाइन उपलब्ध करून दिला आहे. आॅनलाइन अर्जाचा पहिला प्रयोग भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात २१ हजार उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील ३ हजार ५०० लोकांनी अर्ज जमा केले आहेत. आॅनलाइनमुळे उमेदवारांना चांगला फायदा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच ‘मोबाईल अॅप’चा वापर
By admin | Published: July 18, 2015 4:20 AM