पुणे : अस्सल भारतीय शैलीत आविष्कृत झालेल्या भारतीय चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रथमच युरोपातील स्पेनसारख्या कलाप्रिय देशात साकारले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून रे आर्ट फाऊंडेशनने माद्रिदमध्ये कुडल हिरेमठ आणि डी. चौधरी या भारतीय चित्रकारांची जलरंगातील चित्रे प्रदर्शित केली आहेत. भारतीय शैलीतील मंदिरे, गोपुरे, नद्यांचे घाट, वाडे, महाद्वारे या वास्तूविशेषांची चित्ररुपे स्पेनवासीयांना भुरळ घालत आहेत. पुण्यातील रे आर्ट फाऊंडेशनचे संचालक प्रशांत भोलागीर आणि विराज परदेशी यांच्या प्रयत्नातून हे प्रदर्शन साकारले आहे.
जगविख्यात चित्रकार पाल्बो पिकासो, साल्वेदार डाली यांच्या देशात आणि माद्रिदसारख्या कलाकारांचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या शहरात प्रथमच दोन भारतीय चित्रकारांचा प्रतिभाविष्कार सादर झाला आहे. यानिमित्ताने भारतातील चित्रकारांची कला, चित्रशैली, कलामाध्यमावरील प्रभुत्व आणि त्यांनी जपलेले भारतीयत्व यांचे दर्शन युरोपीय कलाप्रेमींना आकर्षित करून घेत आहे. हे प्रदर्शन माद्रिद येथे २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान सकाळी ९ तेरात्री १० या वेळेत खुले राहणार आहे.
रे आर्ट फाऊंडेशनच्यावतीने भारतीय चित्रकारांसाठी परदेशात नवे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यानिमित्ताने भारतीय कलाविचारांचे जागरण जागतिक स्तरावर समकालीन संदर्भात सुरू होईल. कलाकार आणि त्यांचे आविष्कार यांची ही कलात्मक देवाणघेवाण यापुढेहीनव्या संकल्पना घेऊन सुरू राहील, अशी माहिती प्रशांत भोलागीर यांनी दिली.