पिंपरी : हिवाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्या आणि तळ्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षी येत असतात. पिवळी लिटकुरी (ग्रे हॅडेड कॅनेरी फ्लायकेचर) हिवाळी पाहुण्या पक्ष्याने चिंचवडला प्रथमच भेट दिली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्षी निरीक्षकांनी शहरातील तळी, नद्या, पाणवठ्यांची पाहणी केली आहे. अलाइव्ह संस्थेच्या वतीने पक्षी निरीक्षण, अभ्यास केला जातो. प्रशांत पिंपळनेरकर, प्रदीप खैरे आणि पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांना पिवळी लिटकुरी हा हिवाळी पाहुणा नुकताच चिंचवड येथे पक्षी निरीक्षण करताना आढळून आला. याबाबत पक्षितज्ज्ञ उमेश वाघेला म्हणाले, ‘‘युरोप, सायबेरिया, रशिया, मंगोलिया अशा विविध देशांतून तसेच हिमालयातून दर वर्षी हिवाळ्यात आपल्याकडे अनेक पक्षी वास्तव्यास येतात. तिथे त्यांच्या कायम अधिवासात हिवाळ्यात बर्फ पडल्यामुळे अन्न मिळेनासे होते. तसेच तापमानसुद्धा शून्याच्या खाली गेल्याने त्यांना स्थलांतर करावे लागते. त्या देशांपेक्षा भारत अधिक उबदार असल्याने ते आपल्याकडे स्थलांतर करून येतात. हिवाळा संपताच ते मायदेशी परत जातात. पिंपरी-चिचंवड परिसरात याआधी याची नोंद नाही. अलाइव्ह संस्थेद्वारा २००७पासून पिंपरी-चिचंवड परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी करण्यात येत आहे. आता त्या यादीत पिवळ्या लिटकुरीच्या दर्शनाने आणखी एका प्रजातीची वाढ झाली आहे. पवना, मुळा, इंद्रायणीनदी परिसरामध्ये विविध पक्षी आले आहेत.’’ (प्रतिनिधी)अशी आहे पिवळी लिटकुरीफक्त ९ सेंटिमीटरचा इवलासा पक्षी थेट हिमालयातून स्थलांतर करून उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात हिवाळ्यात हंगामी वास्तव्यास येतो. दाट झाडीत राहणारा हा पक्षी कीटकभक्षी असून सुमधुर, कर्णप्रिय शीळ घालतो. महाराष्ट्रात फक्त पश्चिम घाटात आणि काही मोजक्या ठिकाणी क्वचितच दिसल्याची नोंद आहे. मात्र, पिंपरी-चिचंवड परिसरातील ही पहिलीच नोंद आहे. याद्वारे पिंपरी-चिचंवड परिसरात इतर ठिकाणी हा पक्षी दिसल्यास पक्षी निरीक्षकांनी माहिती द्यावी.’’
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘पिवळी लिटकुरी’चे दर्शन
By admin | Published: December 30, 2016 4:47 AM