बारामती : तालुक्यातील झारगडवाडी येथे यंदा प्रथमच हनुमान जयंती उत्सवाचे औचित्य साधून झारगडवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी घोड्यांच्या नृत्यस्पर्धा (अश्वनृत्य) स्पर्धा आयोजित केल्या. या वेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. ग्रामस्थांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास २० घोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यापूर्वी या गावात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येत होती. या शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही प्रथा बंद पडली. राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. मात्र, बैलगाडा शर्यतीच्या ऐवजी घोड्यांच्या नृत्यस्पर्धा हा वेगळा प्रयोग राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत विश्वजित खोमणे यांच्या ‘माऊली’ या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण स्तरावर प्रथमच झालेल्या या स्पर्धेसाठी विविध भागातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे बैलगाडा शर्यतींवरून राजकारण पेटलेलं असताना आणि १२ वर्षांपेक्षा अधिक काळ बैलगाडा शर्यतींमुळे गाजलेल्या झारगडवाडीतील ग्रामस्थांनी घोड्यांच्या नृत्य स्पर्धांचं आयोजन करून एक वेगळा पायंडा पाडला.बारामती तालुक्यातील झारगडवाडी.. या गावात दर वर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या गावात तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जात होतं. मात्र मागील पाच वर्षांपूर्वी शर्यतींवर बंदी आल्यानं या गावातील हनुमान जयंतीच्या उत्साहावर पाणी पडलं. तेव्हापासून गावात शर्यती आयोजित करणंही बंद झालं. काही दिवसांपूर्वीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी शासनानं उठवलीय. मात्र येथील तरुणांनी एकत्र येत बैलगाडा शर्यत आयोजित करण्याच्या फंदात न पडता यावर्षी घोड्यांच्या नृत्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले.झारगडवाडी गावाला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा आहे. योगायोगानं यावर्षी शर्यतींवरील बंदीही उठलीय. मात्र तरीही ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केल्याचं आयोजक प्रवीण बोरकर यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतीपेक्षा घोड्यांच्या नृत्यस्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच या आगळ्यावेगळ्या स्पर्धा आयोजनाचा वेगळा आनंद असल्याचं आयोजक मधुकर बिचकुले, पोपट कुलाळ, प्रवीण बोरकर, बाळासाहेब निकम, राजेंद्र बोरकर, रणजित बोरकर, रमेश बोरकर, संजय जगताप, यांनी सांगितलं.(प्रतिनिधी)
पहिल्यांदाच रंगले घोड्यांचे कुर्रेबाज नृत्य
By admin | Published: April 13, 2017 3:36 AM