लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवड्यात सातत्याने एक हजाराच्या खाली घसरत असताना सोमवारचा दिवस (दि. २४) पुणेकरांसाठी आणखी दिलासादायक ठरला. साधारणत: तीन महिन्यांनंतर म्हणजे १७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्या आत आला. दिवसभरात केवळ ४९४ कोरोनाबाधितांची नोंद पुण्यात झाली. तर सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ९ हजार ७२४ इतकी दहा हजारांपेक्षा कमी नोंदली गेली.
सोमवारी शहरात ७ हजार ५८२ चाचण्या करण्यात आल्या. यातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ ही ६.५१ टक्के इतका कमी आढळला. गेल्या काही दिवसांमध्ये दर शंभर चाचण्यांमागे आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरत चालली आहे. या घसरत्या ‘पॉझिटिव्हिटी रेट’मुळे कोरोना संसर्ग ओसरत असल्याचे स्पष्ट होते आहे. दरम्यान, नव्या रुग्णांची संख्या पाचशेंच्या आत आली असतानाच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सोमवारी १ हजार ४१० झाली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला. यातील १९ जण पुण्याबाहेरील आहेत. सोमवारी पुण्यातील मृत्यूदर १.७२ टक्के होता. शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या २ हजार ५८७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांचीही संख्या गेल्या दोन-तीन दिवसांत निम्म्यावर आली. गंभीर रुग्ण संख्या सध्या १ हजार ५९ आहे.
शहरात आत्तापर्यंत २४ लाख ४४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ४ लाख ६६ हजार ११९ जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी ४ लाख ४८ हजार ३५२ जण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत शहरात ८ हजार ४३ कोरोना बळी झाले आहेत.