पुणे : अवघ्या महिनाभरावर लाेकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. जगातल्या सर्वात माेठ्या लाेकशाहीची सार्वत्रिक निवडणूक असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष आहे. भारतात येत्या काळात काेणाचे सरकार येणार हे या निवडणुकांमधून स्पष्ट हाेणार आहे. भाजपा, काॅंग्रेस आणि इतर पक्ष हे विविध मुद्दे घेऊन नागरिकांसमाेर येत आहेत. या निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं, तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात याचा घेतलेला आढावा.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना सध्या काॅंग्रेसने चालविलेल्या चाैकीदार चाेर है आणि भाजपाच्या मै भी चाैकीदार या कॅम्पेनमध्ये रस नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच लक्ष इतर मुद्द्यांवरुन भरकटविण्यासाठी हे कॅम्पेन चालविण्यात येत असल्याचे तरुण सांगतात. प्रथमेश यादव म्हणाला, आत्तापर्यंतच्या जाहीरनाम्यांमध्ये जुनेच विषय पुढे केले जात आहेत. राम मंदिर, ट्रिपल तलाक अशाच मुद्दांना निवडणुकीच्या काळात पुढे केले जात आहे. परंतु शिक्षणावर फारसं बाेललं जात नाही. शिक्षणावर लक्ष देणे त्यांचा जाहीर नाम्यात समावेश करणे गरजेचे आहे. शिक्षण हे माेफत आणि समताधिष्ठीत असावं.
नितेश घुगे म्हणाला, निवडणुकांमध्ये युवकांना संधी द्यायला हवी. पक्ष हे त्याच त्याच उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी बदलायला हवे. त्याशिवाय विकास हाेणार नाही.
राहुल शेळके म्हणाला, प्रस्तापित राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही माेठ्याप्रमाणावर दिसून येते. त्यात सामान्य नागरिकाला, तरुणाला स्थान दिले जात नाही. तसेच जाहीरनाम्यात आर्थिकबाबींवर लक्ष दिले जात नाहीत. आर्थिक नियाेजन कसे असेल, शिक्षणावर किती खर्च करणार हे सांगितले जात नाही. ते सांगायला हवे.
अभिजित यामगार ला वाटते शिक्षण ही काळाजी गरज आहे. आज माेठ्याप्रमाणावर बेराेजगार भारतात वाढत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षणातून केवळ कारकून निर्माण हाेत आहेत. उद्याेजक निर्माण हाेतील अशा शिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. वेगळ्याप्रकारचं शिक्षण घेण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तसेच आजूबाजूचं वातावरण आपल्याला प्रवृत्त करत नाही. त्यासाठी सरकारने विविध याेजना राबवून त्या ग्रामीण भागापर्यंत पाेहचवायला हव्यात. ग्रामीण, आदीवासी भागात शिक्षण पाेहचवलं पाहिजे. युवक सुद्धा उद्याेजक हाेऊ शकतात ही जाणीव सरकाने युवकांमध्ये निर्माण करायला हवी.
चाैकीदार चाेर है आणि मै भी चाैकीदार या कॅम्पेनमुळे इतर मुद्दे निवडणूकीत मागे पडत आहेत असे सुनिल जाधवला वाटते. शिक्षण मूलभूत गरज आहे. क्रांतीसाठी शिक्षण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शिक्षण, आराेग्य, राेजगार याचा समावेश जाहीरनाम्यांमध्ये असणे आवश्यक आहे. या सरकारने राेजगाराबाबत जे आश्वासन दिले ते पाळले नाही. स्टार्ट अप इंडिया सारख्या याेजना या केवळ कागदावर आहेत. राेजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता आहे. आम्हाला 15 लाख नकाेत तर 15 लाखांचं पॅकेज मिळणारं शिक्षण हवंय. विद्यार्थ्यांना संशाेधन करण्यासाठी शिष्यवृत्ती द्यायला हवी.
आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता, तरुणांचा उपयाेग हा राष्ट्रउभारणीसाठी नव्हे तर राजकीय पक्षांच्या साेयीसाठी करण्यात येत आहे. युवकांची क्रयशक्ती वेगळ्या मार्गांना जाताना दिसून येत आहे. राजकीय साक्षरतेची गरज आहे. राेजगारक्षम शिक्षण आवश्यक आहे असे आकाश मंदाडे ला वाटते.
राहुल इंगळे म्हणताे, आपला देश विकसित करायचा असेल तर शिक्षणावर माेठ्याप्रमाणवर खर्च करायला हवा. शिक्षणामुळे लाेकं जागृत हाेतील आणि सजग नागरिक निर्माण हाेतील.