पुणे: कृषी महाविद्यालयाकडून येणारा मेट्रोचा पहिला बोगदा गुरुवारी मेट्रोच्या नियोजित बुधवार पेठ भुयारी स्थानकापर्यंत पोहचला. याच मार्गावरचा दुसरा बोगदाही लवकरच या ठिकाणापर्यंत पोहचेल. स्वारगेटकडून येणारा बोगदा मंडईत येणार आहे.
मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग पूर्ण भुयारी आहे. शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके या मार्गात आहेत. कृषी महाविद्यालयाच्या बाजूने दोन व स्वारगेकडून दोन या पद्धतीने मेट्रोच्या या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. अत्याधुनिक टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन) यंत्राद्वारे हे खोदकाम सुरू आहे. खोदकाम होत असतानाच या यंत्राद्वारे खोदलेल्या भागाला आतील बाजूने सिमेंटच्या प्लेट बसून एक ट्यूब तयार होते. कृषी महाविद्यालयाकडून बुधवार पेठेतील नियोजित स्थानकापर्यंत अशी एक ट्यूब आता तयार झाली.
स्वारगेटकडून सुरू झालेले बोगद्याचे काम आता लवकरच मंडईपर्यंत पोहचेल. बुधवार पेठेतून आता खोदकाम सुरू होऊन ते मंडईपर्यंत येईल. मंडईतील नियोजित भुयारी स्थानकात हे चारही बोगदे एकत्र झाले की शिवाजीनगर ते स्वारगेट असा एक सलग भुयारी मार्ग तयार ह़ोईल. त्यातील ५ भुयारी स्थानकांचे कामही सध्या सुरू आहे.
नदीखालून भुयारी मार्गाने मेट्रो जाणारे पुणे हे भारतातील चौथे शहर झाले आहे. याआधी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी), आणि चेन्नई (कुम आणि अद्यार) या महानगरांमध्ये टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा बनविण्यात आला आहे.
मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे ३३ मीटर खोल आहे. नदी पात्राच्या तळापासून तो १० मीटर खोलीवरून जात आहे. टीबीएम बुधवार पेठेपर्यंत आल्याने मेट्रोच्या कामाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला. महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यावेळी उपस्थित होते.