पुणे : वाढत्या वयानुसार पाठीच्या मणक्याच्या समस्या बळावतात. कधी ही समस्या इतकी तीव्र होते की दैनंदिन काम करणेही शक्य नसते. त्या वेळी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण वाढत्या वयात शस्त्रक्रिया म्हणजे भीतीच वाटते. या वयात शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याचा, शस्त्रक्रियेनंतर काही गुंतागुंत किंवा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. पण पुण्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ८१ वर्षांच्या महिलेवर यशस्वी स्पाईनल सर्जरी केली आहे. यासाठी त्यांनी रोबोटच्या मदतीने केल्या जाणाऱ्या ओ-आर्म अँड स्टेल्थ नेव्हिगेशन टेक्निकचा वापर केला. पुणे शहरात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
उस्मानाबादच्या ८१ वर्षांच्या खैरून्नीसा जागीरदार यांच्यावर ओ-आर्म अँड स्टेल्थ नेव्हिगेशन टेक्निकने स्पाइन सर्जरी केली. त्यांच्यावर रिव्हिझन स्पाइन सर्जरी करण्यात आली. म्हणजेच पहिल्या सर्जरीमुळे समस्येपासून पूर्ण आराम न मिळाल्यास, काही समस्या उद्भवल्यास किंवा काही त्रुटी राहिल्यास दुसऱ्यांदा सर्जरी केली जाते. खैरून्निसा यांच्यावर २००३ साली पहिली शस्त्रक्रिया झाली आणि आता दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पराग संचेती म्हणाले, “सध्याच्या काळात स्पाइन सर्जरी सुरक्षित, अचूक आणि जास्तीत जास्त चांगले परिणाम देणारी झाली. ओ-आर्मने या स्पाइन सर्जरीला आणखी एका वरच्या पातळीवर नेले. या वयात शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. रुग्णाला पॅरालिसिस, इन्फेक्शन होऊ शकतं. पण ओ-आर्ममध्ये हे होत नाही. त्यामुळे वयस्कर व्यक्तींसाठी ही प्रभावी आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे.”
चौकट
काय आहे तंत्रज्ञान?
डॉ. शैलेश हादगावकर म्हणाले, “ओ-आर्म टेक्निकमुळे आपण शस्त्रक्रिया करतानाच काय काय बदल होत आहेत ते पाहू शकतो. म्हणजेच रिअल टाइम डेव्हलमेंट पाहू शकतो. त्यामुळे आता पुढे काय करायचे हे तपासण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर सीटी स्कॅन किंवा एमआरआयची गरज नाही. शस्त्रक्रिया करताना काही चुका होण्याचा धोका कमी झाला. शिवाय रुग्णाला जास्तीत जास्त सुरक्षाही मिळते. शस्त्रक्रियेनंतर पॅरालिसिस किंवा इन्फेक्शनचा धोका असतो. पण या टेक्निकमुळे जवळपास हा धोका नाहीच.”