वडगाव मावळ : गेले कित्येक वर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अजिवली गावातील तरुणांनी यंदा ग्रामदैवत वाघजाई देवीचा वार्षिक उत्सव रद्द केला आहे. आधी पिण्याचे पाणी मग जत्रा, असा निश्चय करून ग्रामस्थांनी केला. जत्रेसाठी येणारा खर्च वाचवून त्यातून गायरानात तळे खोदण्यास सुरुवात केली आहे. तळ्याला पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मार्च ते जून महिना गावातील महिलांसाठी अतिशय कठीण काळ असतो. आपल्या घरातून दिसणारा पवना धरणाचा मोठा जलाशय फक्त नजरेतच साठवून ठेवावा लागतो. ग्रामपंचायतीच्या वतीने धरणात सोडलेल्या मोटारी पाण्याची गरज असलेल्या काळात कोरड्या पडतात. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मोटारीनेदेखील पाणी गावाला पुरवता येत नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था या गावातील नागरिकांची झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर असल्यामुळे पहाटे चार ते पाच वाजल्यापासूनच महिला, लहान मुली, पुरुषांची विहिरीभोवती पाण्यासाठी रांग लागलेली असते. त्यात ही विहीरदेखील गावाबाहेर असल्यामुळे तीन-तीन हंडे डोक्यावर घेऊन एक ते अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. आपल्या घरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, हीच बाब या गावातील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने गावातील सूत्रे आपल्या हातात घेतली व गेल्या वर्षभरात गावातील विकासकामांवर भर देण्याचे ठरवले. नवसाला पावणारी वाघजाई देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या देवीचा उत्सव हा देवीच्या बगाडाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. यात्रेतील मनोरंजक कार्यक्रमांवर होणारा खर्च पाण्यासाठी वापरण्याचे तरुणांनी ठरवले. परंतु, गावाची शेकडो वर्षांची परंपरा असणारी जत्रा रद्द करण्याच्या निर्णयाला काही नागरिकांनी विरोध दर्शवला. परंतु, तरुण निर्णयावर ठाम होते. त्यांनी गावातील ज्येष्ठांना दुष्काळाविषयी समजावून सागितले. जत्रा रद्द करून गायरानात लोकवर्गणीतूनतळे तयार केले. (वार्ताहर)गावात सगळ्या सुविधा आहेत. गावातील तरुण सुशिक्षित आहेत. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे गावात मुलांची लग्नही जमत नव्हती. दुसऱ्या गावातील नागरिक गावात मुलगी देण्यास टाळाटाळ करत होते. भविष्यात पवना धरणातील जलसाठ्यात घट झाली, तरी गावाला पावसाळा येईपर्यंत या तळ्यातून पाणी वापरता येऊ शकते, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जत्रेच्या निमित्त मोठमोठे फ्लेक्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, जाहिरातबाजीवरील पैशांची उधळण थांबवून एका विधायक कामासाठी गावातील तरुणांनी जत्रा रद्द करून पिण्याच्या पाण्यासाठी तलाव खोदला. याचे मावळातील इतर गावांकडून कौतुक होत आहे.गावाच्या जत्रेची परंपरा शेकडो वर्षांची आहे. पण, पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट पाहून गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यास पुन्हा महिलांना पायपीट करावी लागेल. म्हणून जत्रा रद्द करून त्या पैशांचा उपयोग पाण्यासाठी करायचा, असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. गावाची जत्रा चालू असताना घरातील महिलांना जत्रेत येता येत नाही. घरात पाहुणे असल्यामुळे त्यांचा संपूर्ण वेळ पाणी भरण्यातच जातो. त्यामुळे पहिले पाणी, मग जत्रा, असे माजी सरपंच सुनील ओव्हाळ यांनी सांगितले.
पहिले पाणी, मग जत्रा
By admin | Published: April 10, 2016 4:02 AM