आंबेगाव : जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. उपनगरात पाऊस सुरू झाला असला तरी उन्हामुळे सध्या या तलावातील पाणी खुपच कमी झाले आहे. त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत आहेत. मेलेल्या माशांमध्ये लहान माशांचे प्रमाण जास्त आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द, जांबुळवाडी रस्त्याचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. आंबेगाव परिसरासाठी महत्त्वाचा व अभिमानस्पद असणाºया या तलावाची निमिर्ती आंबेगाव खुर्द व जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेअंतर्गत केली होती. साधारण ९५ आर जमिनीमध्ये सदर तलाव पसरलेला आहे. पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असतो. या तलावाचे खालील बाजूस विहिरी पाडून आंबेगाव खुर्द, जांभुळ वाडी या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव हा पाझर तलाव असल्यामुळे व उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत असल्यामुळे तलावातील पाणीसाठा पातळी खुपच प्रमाणात कमी होत चालला आहे.
जांभुळवाडी तलावातील प्रदूषित पाण्याने माशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:47 PM