बारामती : तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते, अशी जुनाट समजूत खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात मंगळवारी (दि.२९) दुपारी अनर्थ घडला. बालिका लाळ गाळत असल्याने तिच्या मावशीने या मुलीच्या तोंडात फिरविण्यासाठी मासा सोडला. दुर्दुैवाने तो मासा निसटून थेट त्या मुलीच्या श्वासमार्गात अडकला. त्यानंतर मृत्यूच्या दाढेत गेलेल्या त्या मुलीला वाचविण्यासाठी तिच्या जन्मदात्याने प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर बारामतीच्या डॉक्टरांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत हे संकट दूर केले.मुळचे चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी यांचे कुटुंब पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी आले आहेत. ते सध्या शिर्सुफळ येथे आहेत. त्यांना साडेचार महिन्यांची मुलगी आहे. तिचे नाव अनू असून ती जन्मल्यापासून लाळ गाळते. त्यामुळे त्यावर उपाय करण्यासाठी मुलीच्या मावशीने लाळ गळणे बंद होण्यासाठी लहान मुलीला तोंडात मासा ठेवून घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मासा बुळबुळीत असल्याने थेट हातातून निसटून मुलीच्या श्वास नलिकेत अडकला. तिच्या वडिलांनी दुचाकीवर बसवून तिला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, दुचाकीतील पेट्रोल संपले.त्यानंतर जिवाच्या आकांताने बापु माळी यांनी रस्त्यावर मदतीची याचना केली.तेथुन जाणाऱ्या स्कुलबस चालकाने त्यांना बारामतीत आणले.त्यांनी मुलीला शहरातील डॉ. राजेंद्र मुथा यांच्याकडे आणले.तोपर्यंत काही कालावधीत मुलीचा श्वास बंद होत, हृदय बंद पडण्याची क्रिया सुरू झाली होती. यावेळी यावेळी डॉ. सौरभ मुथा यांनी मुलीची तपासणी करीत जीवन संजीवनी क्रिया करून बंद पडलेला श्वासासह तसेच हृदय पूर्ववत सुरू केले. तसेच दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया करून तीस मिलिमीटर लांबंीचा गिळलेला मासा बाहेर काढला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे साडे चार महिन्याच्या मुलीला जीवदान मिळाले. यावेळी भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार, डॉ. वैभव मदने यांनी मोठे कौशल्य वापरुन प्रयत्न केले.मुलीला दोन दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडणार आहे. मुलीचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत असल्यामुळे मुलीला थंडीच्या बचावासाठी उबदार कपडे मोफत भेट देण्यात आले असल्याचे डॉ सौरभ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
श्वसननलिकेतून काढला मासा; बालिकेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 2:13 AM