भिगवण : कोरोनाच्या धास्तीने सुरु असलेल्या लोंकडाऊनच्या काळात तक्रारवाडी गावातील काही महिला आणि लहान मुले उजनीकाठी फिरण्यास गेली असता फुगवट्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरली होती.मात्र सुसाट्याचा वारा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जावून बुडत असताना किनारी असणाऱ्या मच्छिमाराने जीवाची पर्वा न करता उडी घेत सर्वांचे प्राण वाचविल्याची घटना तक्रारवाडी गावात घडली .याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नागरिकांना घरात अडकून राहावे लागत आहे.तर गावात अथवा भिगवण शहरात फिरायचे म्हटल्यावर पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागतो.त्यामुळे तक्रारवाडी गावातील नागरिक आणि महिला वनविभागाच्या टेकडीवर पाय मोकळे करण्यासाठी जात असतात.तर काही उजनी धरणाच्या पाणी फुगवट्यावर जात पोहण्याच्या आनंद लुटत असतात.याचप्रकारे तक्रारवाडी गावातील काही महिला आपल्या लहानग्यांना घेवून उजनी किनारी फेरफटका मारीत होते. यातील काही लहानगी आणि महिला पोहण्यासाठी पाण्यात उतरली होती. याचवेळी सुटलेल्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोन लहान मुळे पाण्यात गटांगळ्या खावू लागली.याची जाणीव होताच यातील एका महिलेने दोन मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत दुसरी महिला मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडू लागल्याने सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला.
याच वेळी किनार्यावर मासेमारी साठी जाणाऱ्या राजू नंदू परदेशी याच्या हा अघटीत प्रकार दिसून आल्याने त्याने प्रसंगावधान दाखवीत तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता उडी घेत सर्वांना सहीसलामत किनारी आणले.परदेशी याने दाखविलेल्या धाडसामुळे दोन महिला आणि तीन लहानग्याचे प्राण वाचले. त्यामुळे नागरिकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी महिला आणि मुलांचे प्राण वाचविणाऱ्या राजू परदेशी या मासेमाराचे पोलीस ठाण्यात बोलावून अभिनंदन केले.तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना त्याच्या कार्याची माहिती देत या तरुणाचे नाव राष्ट्रपती जीवन रक्षक पदकासाठी पाठविण्याची शिफारस केली असल्याची माहिती माने यांनी दिली