पुणे : उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शहरातील पाण्याच्या मागणीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहराच्या अनेक भागात टँकर मागवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनुसार पुण्याला १५ जुलैपर्यंत आवश्यक सुमारे साडेपाच टीएमसी पाणी खडकवासला धरणसाखळीत राखीव ठेवण्यात आला आहे.
खडकवासलात सध्या १२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, अडीच टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले असून, अजून अडीच टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. वाढत्या उन्हामुळे एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
पुणे महापालिका सध्या खडकवासला धरणातून दररोज सुमारे १,४७० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी उचलत आहे. महापालिकेने मध्यंतरी विविध उपाययोजना करून हे प्रमाण १४२०-१४२५ एमएलडीपर्यंत कमी केले होते, परंतु मागणी वाढल्याने हे प्रमाणही वाढले आहे. वितरणातील विविध ठिकाणची गळती शोधून त्याची दुरुस्ती केल्यामुळे १,४७० एमएलडी पाणी सध्या पुरेसे ठरत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास ही मागणी वाढू शकते.
खडकवासला प्रकल्पातील पाण्याची सद्यस्थिती पाहता, पावसाळा लांबल्यास १५ जुलैपर्यंत जेमतेम एक टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या व्यावसायिक वापरावर बंदी घातली आहे. बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक केले आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.