लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनधिकृतरित्या बांधकाम करून उभा केलेला पुतळा काढून घ्या, असे सांगण्यास गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांना धक्काबुक्की झाली. ही घटना येरवड्यातील सेवालाल चौक नाईकनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. सनी रमेश चव्हाण (वय २६), राहुल सुरेश चव्हाण (वय ३१), आकाश सुरेश चव्हाण (वय २९), बबलू दुबील ऑझ (वय ३८) व लक्ष्मी सुरेश चव्हाण (वय ४५) यांना अटक झाली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अजित मगदुम यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवडा येथील नाईकनगरमधील सेवालाल चौकात आरोपींनी आरोपींनी बेकायदेशीररीत्या जमाव एकत्र केला. त्यानंतर सार्वजनिक जागेवर संबधित विभागाची परवानगी न घेता चौकात बांधकाम करून पुतळा उभा केला. तो पुतळा काढून घेण्यास त्यांना सांगण्यात आले. परंतु, त्यांनी पुतळा काढण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणी दंगा करून गोंधळ घातला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण करत त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करत आहेत.