पुणे : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या विनोद दोशी फेलोशिपसाठी बेंगलोरचे संदीप शिखर, पुण्यातील प्रकाशयोजनाकार, दिग्दर्शक विक्रांत ठकार, नाशिकमधील समांतर रंगभूमीवर कार्यरत असलेले प्रविण काळोखे, पॉँडेचेरीच्या नृत्यांगना निम्मी राफेल व मुंबईतील अभिनेत्री कल्याणी मुळे या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपयांची फेलोशिप असून या वर्षीपासून पुरस्काराची कक्षा राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आहे.ही फेलोशिप देण्याचे प्रतिष्ठानचे यंदाचे अकरावे वर्ष असून आजपर्यंत ४७ कलाकारांना फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. विनोद दोशी यांनी कला व साहित्य क्षेत्रात प्रचंड रूची होती. रंगभूमीप्रती उत्कट प्रेम असल्याने त्यांनी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी खूप परिश्रम घेतले. फेलोशिपविषयी माहिती देताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अशोक कुलकर्णी म्हणाले, २००३साली काही कलाकारांनी साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली. कला व कलाकारांना प्रोत्साहन देणे हा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. कलेच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या व कला क्षेत्रातच महत्वाकांक्षी कारकिर्द करू इच्छिणाऱ्यांना दरवर्षी फेलोशिप दिली जाते.फेलोशिपवितरण सोहळा दि. २१ फेब्रुवारी रोजी पंडित फार्मस येथे राष्ट्रीय ख्यातकिर्त कला संपादक व समीक्षक सदानंद मेनन यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या वेळी किरण यज्ञोपवित, मोहित टाकळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाच कलावंतांना विनोद दोशी फेलोशिप
By admin | Published: February 04, 2016 1:20 AM