लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को. ऑप साेसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ मालमत्ता कवडीमोल किमतीला विकून ठेवीदारांचे तब्बल ४८ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान केले. अटकेतील पाच आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १८३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात सुमारे २ हजार ५०० पानी दोषारोपपत्र दाखल केले.
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी माहिती दिली.
सुजित सुभाष बाविस्कर ऊर्फ वाणी (वय ४२), धरम किशोर साखला (वय ४०), महावीर मानकचंद जैन (वय ३७), विवेक देविदास ठाकरे (वय ४५), कमलाकर भिकारी कोळी (वय २८, सर्व रा. जळगाव) अशी दोषारोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत.
शासनाने बीएचआरवर प्रशासक म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली होती. त्याने अटक आरोपी व इतरांशी संगनमत करुन पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करुन सुनील झंवर व त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदेशीरीत्या वर्ग करुन पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्यांने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केला.
या आरोपींनी कृणाल शहा याच्याकडून खाजगी वेबसाईट तयार करुन त्यावर पुण्यातील निगडी, घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव खुर्द आणि जळगाव येथील पतसंस्थेच्या स्थावर मालमत्ता विक्रीची निविदा काढली. त्यात मर्यादित लोकांनी टेंडर भरुन या मालमत्ता केवळ ७ कोटी ७५ लाख ५४ हजार १२१ रुपयांना विकल्या. त्यामुळे पतसंस्थेचे ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.
लिक्विडेटर जितेंद्र कंडारेने पतसंस्थेची कर्जवसुली करुन तसेच मालमत्ता विकून त्याचे सर्व ठेवीदारांचे देणे समान तत्वाचा वापर करुन वितरीत करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ठेवीदारांना केवळ ३० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन कर्जदारांना फायदा करुन दिला.