धनकवडी : पुणे शहर व परिसरातील दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सहकारनगर पोलीसांनी सापळा रचून अटक केली. महेश अनिल साळुंखे (वय २४, रा. सध्या रामचंद्र नगर, दत्त मंदिर जवळ धनकवडी, मूळ रा. कर्जत, जि. अहमदनगर) व शुभम सिताराम शिंदे (वय १९, सध्या रा. सह्याद्री नगर, प्रभात चौक, धनकवडी, मूळ रा. मु. पो. खरीव, ता. वेल्हे) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक वाहन चोरट्यांची माहिती काढत होते. चोरीच्या गुन्ह्यांना अटकाव करण्या कामी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांच्यासह पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सतिष चव्हाण व प्रदीप बेडीस्कर यांना दुचाकी व मोबाईल चोरणारे सराईत धनकवडी स्मशानभूमी परिसरात एका इसमास दुचाकी विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनानुसार घटनास्थळी जाऊन दुचाकीसह थांबलेले महेश साळुंखे व शुभम शिंदे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकी गाडीचे कागदपत्रांची विचारणा केली असता ते दोघे उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. पोलिसांनी त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी धनकवडी परिसरातून दुचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार सहकार नगर पोलीसांनी महेश साळुंखे व शुभम शिंदे या दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमधील ३, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील १ व बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण मधील १ असे एकूण ५ दाखल गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किंमतीच्या ४ दुचाकी व ३३ हजार रुपये किंमतीचे ४ महागडे मोबाईल असे एकूण एक लाख ३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
अप्पर पोलीस आयुक्त पुणे प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, सागर पाटील, सहाय्यक पोलीस सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंविद गंभीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवलदार बापू खुटवाड, विजय मोरे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, महेश मंडलिक, किसन चव्हाण, प्रदीप बेडिस्कर, प्रदीप शिंदे यांनी ही कामगिर केली आहे.