पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यामध्ये बांधकाम मजूर असलेल्या एका महिलेसह बालकाचा समावेश आहे. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवीन बांधकाम सुरू आहे. भिंतीच्याकडेला या बांधकामावरील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते.
आज सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ही सीमाभिंत कोसळली. त्याचबरोबर येथील एक झाडही उन्मळून भिंतीवर पडले. त्याखाली प्राथमिक माहिती हाती आली तोपर्यंत १० जण अडकले होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक तामाणे यांनी दिली. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी पोहोचले. उंब्रटकर यांच्या नेतृत्वाखाली बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
कोंढवा येथे शनिवारीच एका सोसायटीची भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्येही बांधकाम मजूरांचा समावेश होता. त्यानंतर पुणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बांधकाम मजूरांच्या सुरक्षितेसाठी उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत असे सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने याबाबत अद्यापही गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे.