पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एकाच दिवशी ५ नगरसेवकांनी त्यांचे राजीनामे आयुक्तांकडे सादर करून पक्षांतराची तयारी केली आहे. काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या ३ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे, राष्ट्रवादी व मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिला.काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक मिलिंद काची, सुनीता गलांडे तसेच राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे व मनसेच्या प्रिया गदादे यांनी सोमवारी राजीनामे दिले. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रभागात एकटे पडलेल्या नगरसेवकांकडून पक्षांतराचा मार्ग अवलंबला जात आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढत आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी, शिवसेनेतही विद्यमान नगरसेवकांकडून प्रवेश केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे बिबवेवाडी, वडगावशेरी येथे सभा होणार आहेत. या कार्यक्रमात रेखा टिंगरे, सुनीता गलांडे यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या अश्विनी जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मिलिंद काची यांनी तांत्रिक कारणास्तव राजीनामा दिला असून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आचारसंहिता लागू झाल्यानंतर आणखी काही नगरसेवकांकडून पक्षांतर केले जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर तिकीट वाटपामध्ये डावलले गेल्यास ऐनवेळीही मोठ्याप्रमाणात पक्षबदल होऊ शकतील. (प्रतिनिधी)
पाच नगरसेवकांचे एकाच दिवशी राजीनामे
By admin | Published: January 04, 2017 5:31 AM