पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्षा लागून राहिलेले पालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून सोमवारी मांडण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना सढळ हाताने प्रत्येकी पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर, विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांची मात्र प्रत्येकी अडीच कोटींवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आणि अधिकाधिक नागरी सुविधा देण्यासाठी भाजपाने नगरसेवकांना भरघोस निधी दिला आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना मात्र 98 नगरसेवकांमध्ये अधिक निधी देण्यात आला आहे. प्रत्येक सदस्याला दहा ते बारा कोटींचा निधी देण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नगरसेवकांना त्यांच्या ‘स’ यादीमधील कामे करता आली नाहीत. कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड येऊ लागल्याने निवडणुका तोंडावर असल्यामुळे नगरसेवक अस्वस्थ झाले होते. त्यामुळे स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांची वर्गीकरणे मान्य करण्यात आली. निविदा, पुर्वगणनपत्रक, अशा प्रकारे कामे करुन सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातून ही कामे करण्यात येणार आहेत. वर्गीकरणे मान्य न झालेल्यांना मात्र कामे पुर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर कामांचे पुर्वगणकपत्रक करणे, निविदा तयार करणे, कार्यादेश यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. याच काळात निवडणूकांची प्रभाग रचना, वॉर्ड पद्धती यांचा निर्णय होणार आहे. त्यामुळे मिळालेला निधी कसा खर्च करावयचा हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.