अंगठी कुठे दिसेना म्हणून शोधाशोध करता करता वातावरण गंभीर झाले..! कौतुकाची जागा आता काळजीने घेतली. प्रचंड आकांत उडाला. क्ष किरण तपासणीत गिळलेली अंगठी पोटात आढळून आली! ती अंगठी काढण्यासाठी मग मोठ्या डॅाक्टरांची शोधाशोध सुरू झाली. अखेर रात्रीतून बाळाला पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले. तेथे डॉ. कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून रुबी हॉल दवाखान्यात दाखल करून घेतले. डॉ. किरण धनंजय शिंदे (मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ज्ञ) यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले.
अवघ्या काही तासांचेच आयुर्मान असलेल्या बाळाच्या जिवाला रिंगमुळे धोका उद्भवणार होता. टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन नातेवाइकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले. अत्यंत जड अंतःकरणाने डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाइकांनी परवानगी दिली. डॉ. किरण शिंदे पाटील यांनी अतिशय सावधगिरीने सर्व कौशल्य पणाला लावून डॉ. नंदिनी लोंढे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अंगठी अलगद पोटातून काढली.