नवीन बाळाचा जन्म झाला, सर्वजण नवजात बालकाच्या कौतुकात अखंड न्हावून निघाले... नवीन जन्मलेल्या बाळाच्या ओठावर आणि जिभेला सोने लावण्याची, चाटवण्याची काही ठिकाणी प्रथा आहे त्याप्रमाणे ४-५ नातेवाईक महिलांनी एक ग्रॅम सोन्याची अंगठी आळीपाळीने बाळाच्या जिभेला लावली. काही कळायच्या आत बाळाने ती गिळून टाकली...! अंगठी कुठे दिसेना म्हणून शोधाशोध करता करता वातावरण गंभीर झाले..! कौतुकाची जागा आता काळजीने घेतली. प्रचंड आकांत उडाला. क्ष किरण तपासणीत गिळलेली अंगठी पोटात आढळून आली ..!
ती अंगठी काढण्यासाठी मग मोठ्या डॅाक्टरांची शोधाशोध सुरू झाली, अखेर रात्रीतून बाळाला पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले तेथे डॉ. कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून रुबी हॉल दवाखान्यात दाखल करून घेतले. डॉ. किरण धनंजय शिंदे, (मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ज्ञ) यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले.
अवघ्या काही तासांचेच आयुर्मान असलेल्या बाळाच्या जिवाला रिंगमुळे धोका उद्भवणार होता. टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती.
या सर्व गोष्टी विचारात घेऊन नातेवाईकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले. अत्यंत जड अंतःकरणाने डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाईकांनी परवानगी दिली.
भूलतज्ज्ञ डॉ. नंदिनी लोंढे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाला पूर्ण भूल दिली. डॉ. किरण शिंदे पाटील यांनी अतिशय सावधगिरीने सर्व कौशल्य पणाला लावून डॉ. नंदिनी लोंढे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अंगठी अलगदपणे पोटातून काढली..!
थोड्या वेळाने बाळ रडत असल्याची खातरजमा करून यशस्वीरीत्या वॉर्डमध्ये नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.
खूपच दुर्मिळ अशा या प्रक्रियेसाठी रुबी हॉलमधल्या अद्ययावत एन्डोस्कोपी युनिट आणि तंत्रज्ञांची खूपच मदत झाली, असे डॉ. किरण शिंदे म्हणाले.
--
कोट १
लहान मुले बऱ्याच वेळा पैशाचे नाणे, क्लिप, पिन, खिळा, स्क्रू, पेन्सिल अशा बाह्य वस्तू गिळतात. पण
नुकत्याच जन्मलेल्या बाळाने काही तरी बाह्य वस्तू (फॉरेन बॉडी) गिळणे ही दुर्मिळ घटना आहे
कोणत्याही वस्तूमुळे आतडे बंद होण्याची, आतड्याला जखम होण्याची शक्यता असते
विना शस्रक्रिया दुर्बिणीद्वारे अंगठी काढताना भूलतज्ज्ञ डॉ. नंदिनी लोंढे आणि सर्व टीमची मदत झाली तसेच रुबी हॉलमधील अद्ययावत स्कोपचा आणि मशीनरीचा उपयोग झाला.
- डॉ. किरण धनंजय शिंदे