भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणे क्षेत्रात शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पांडुरंग मारुती पारधी, यमा सोमा पारधी, ज्ञानेश्वर दुंदा वडेकर, हरीबा तुळशीराम असवले या पाच जणांना शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या हत्यारांसह सहायक वनसंरक्षक कीर्ती किशोर जमदाडे-कोकाटे व वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांनी अटक केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक किर्ती किशोर जमदाडे-कोकाटे, वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व इतर वनकर्मचारी साखरमाची गाव पहाणीकरून येत असताना जंगलात वाटेत काही लोक जाळ्या, भाले, कोयते, कुत्री घेऊन जात असल्याचे आढळले. यातील काही लोक वनअधिकाऱ्यांना पाहुन पळून गेले, तर पिंपरगणे गावात रहाणारे पांडुरंग पारधी, यमा पारधी, ज्ञानेश्वर वडेकर, हरीबा असवले हे पाच जण सापडले. या पाच जणांकडे शिकारासाठी लागणारी हत्यारे मिळून आली. या पाच जणांकडे वनअधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही संघटीतरित्या वन्यप्राण्यांची शिकार केली असल्याचे कबुल केले आहे. हे सराईत शिकारी असून या गुन्ह्यात त्यांच्या समवेत अन्य व्यक्तिंचा समावेश आहे. तसेच यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या पाच जणांना घोडेगाव न्यायालयात हजर केले. किर्ती किशोर जमदाडे-कोकाटे यांनी पोलीस कोठडी मागितली. आरोपींचे वकिल अॅड. संजय आर्विकर यांनी हा आदिवासी भाग आहे असे सांगितले.(वार्ताहर)
पाच शिकारी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: December 22, 2014 5:25 AM