पुणे : रविवार पेठेतील सराफी पेढीतून अडीच कोटी रुपये किमतीची पाच किलो सोन्याची बिस्कीटे लांबविणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला पोलिसांनी खारघरमधून अटक केली. याबाबत पोपटलाल गोल्ड पेढीचे मालक राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलंकी यांची रविवार पेठेतील सराफ बाजारात पेढी आहे. ही महिला नेहमी सराफा पेढीत सोने खरेदीसाठी यायची आणि खारघरमधील सराफ व्यावसायिकांना सोने विक्री करायची. सोने खरेदी व्यवहारामुळे सोलंकी यांचा महिलेशी परिचय झाला होता.
दोन दिवसांपूर्वी महिला सोलंकी यांच्या पेढीत खरेदीसाठी आली. तिने पाच किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. रोकड बँक खात्यात जमा करते, असे तिने सोलंकी यांना सांगितले. पेढीसमोर लावलेल्या मोटारीत बिस्किटे ठेवून येते, असे सांगून ती पसार झाली. तिने सोलंकी यांना पैसेही दिले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तांत्रिक तपासात ती खारघर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला खारघरमधून अटक केली.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक निरीक्षक संतोष लांडगे आणि पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.