पुणे :पुणे-सोलापूर मार्गालादेखील सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मांजरी उपबाजार समितीच्या पुढील मार्गावरील सखल भागात गुडघ्याऐवढे पाणी साचल्यामुळे संपूर्ण महामार्गावर चार किलोमीटरपर्यंत कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला खाजगी विकसकांनी जागा ताब्यात घेऊन महामार्गालगत पत्रे मारले आहेत.
या जागांमधून जाणारे नैसर्गिक प्रवाह बुजवण्यात आल्यामुळे महामार्गावर गुडघ्याएवढे पाणी साचले होते. जागा जरी खाजगी मालकीची असली तरी संपूर्ण परिसराला प्रभावित करतील असे पूर निर्माण होणार असतील तर अशा विकसकांवर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची नाराजीची भावना वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
पूर्वकडे फुरसुंगी फाटा व हडपसरकडे मांजरी फाट्यापर्यंत मार्गावर कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांनी फुरसुंगी मार्गे सासवड रस्त्यावरून हडपसर गाठले. तर काही चालकांनी मांजरी माेरे वस्तीमार्गे केशवनगर मार्गे नगररस्ता व कोरेगाव पार्क मार्गे शहरात येण्याचा मार्ग स्वीकारला.