पुणे : शहर गुन्हे शाखेत पाेलिस असल्याची बतावणी करीत विमाननगर येथील युवकास पाॅस्काेअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखविली. तसेच वेळाेवेळी त्याच्याकडून पाच लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाने एका ताेतयाला अटक केली आहे.
मधुकर विलास सापळे (वय ३२, रा. समृद्धी लेक शाेर साेसायटी, जांभूळवाडी, मूळ बेळगाव, कर्नाटक) असे अटक आराेपीचे नाव आहे. त्याच्या विराेधात चंदननगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, विमाननगर भागात राहतात. त्यांचे साेसायटीतील एका कुटुंबासमवेत भांडण सुरू आहे. दरम्यान, आराेपी मधुकर सापळे याने फिर्यादींशी संपर्क साधत पुणे शहर दलाच्या गुन्हे शाखेत पाेलिस असल्याचे सांगितले. तुमचे भांडण सुरू असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक पाेलिस अधिकारी असून त्यांनी तुमच्यावर अकाेला शहरात पाॅक्साेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी खाेटी माहिती दिली. या गुन्ह्यात पाेलिस तुम्हाला अटक करतील आणि नाहक त्रास देतील, अशी भीती दाखविली. मी तुम्हाला या गुन्ह्यातून वाचविताे, असे सांगून वेळाेवेळी त्यांच्याकडून फाेन पे आणि राेख स्वरूपात रक्कम घेतली.
पैसे उकळणाऱ्या मधुकर सापळेविराेधात फिर्यादीने पुणे शहर पाेलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. सहायक पाेलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर पाटील, सुधीर इंगळे, राहुल सकट, अमाेल वाडकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. ताेतया पाेलिस मधुकर सापळे याला पकडून त्याचा पाेलिस असल्याचा बनाव उघडकीस आणला.
उपनिबंधकाच्या सहीचे खाेटे पत्र :
फिर्यादीचे वडील साेसायटीमध्ये खजिनदार आहेत. आराेपीने साेसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठीचे उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या सहीचे बनावट पत्र तयार केले आणि ते फिर्यादीला पाेस्टाद्वारे पाठविले. आपले खजिनदारपद जाईल या भीतीने फिर्यादीच्या वडिलांनीही आराेपीला सव्वा लाख रुपयांची रक्कम दिल्याचे पाेलिसांनी सांगितले.
यापूर्वीही केली फसवणूक
आराेपी विलास सापळे हा मूळचा कर्नाटकातील बेळगाव शहरातील आहे. यापूर्वी त्याच्याविराेधात फसवणुकीचे दाेन गुन्हे दाखल आहेत. त्याचा टूरिस्ट वाहनांचा व्यवसाय आहे. मात्र, लाेकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे कामही ताे करीत हाेता.