सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : जिल्ह्यातील तब्बल पाच पेक्षा अधिक आजी-माजी आमदारांच्या मुलांचे व पुतण्याचे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लाँचिंग होणार आहे. यासाठी संबंधित आमदारांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली असून, गट रचना तयार करताना ते आपल्या मुलांसाठी सोयीचे कसे होतील यासाठी प्रयत्न केले आहेत. याची सध्या संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या महापालिकेसोबतच जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा परिषदेची प्रारुप गट-गण रचना तयार झाली असून, राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रारुप रचना जाहीर करून अंतिम गट-गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. परंतु या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतेक आमदार आपल्या मुलांना व जवळच्या नातेवाईकांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे.
यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज दत्तात्रय भरणे यांची, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मुलगा राजवर्धन हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. तर शिरूरचे आमदार अशोक पवार आपला मुलगा ॠशीराज अशोक पवार याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय एन्ट्री करणार आहे. यासाठी कोरोना काळात ॠशीराज फ्रंटलाईनवर राहून तालुक्यात विविध उपक्रम राबविताना दिसला. या सोबतच दौंड तालुक्यातील माजी आमदार व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांचा मुलगा गणेश रमेश थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आखाड्यात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पुतण्या मयुर मोहिते-पाटील यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार पुत्रांचे लाँचिंग हा चर्चेचा विषय ठरू शकतो.