चाकण : सोमवारी ( ३० जुलै ) रोजी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हिंसाचार प्रकरणी आज ( दि. ३ ) आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून अटकेतील आरोपींची एकूण संख्या २३ झाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आणखी २० जणांना आज ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेतलेल्या तरुणांनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. मराठा मोर्चाच्या आयोजकांनी मागणी केल्यानुसार, निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल केले जात नसून दोषी आढळणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले. या चौकशीकामी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळत असून सीसी टीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटोंच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटत आहे. अजूनही ज्या नागरिकांकडे असे फोटो, व्हिडीओ असल्यास ते चाकण पोलीस ठाण्यात जमा करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवर दगडफेकही झाली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी गुरुवार पर्यंत एकूण १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १५ जणांना गुरुवारी संध्याकाळी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी १५ आरोपींना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज ( दि. ३ ) आणखी पाच आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असून पाचही आरोपींची नावे पोलीस सूत्रांनी गुप्त ठेवली आहेत. याप्रकरणी गुरुवार ( दि. २ आॅगस्ट ) रोजी मनोज दौलत गिरी (वय-२३), सूर्यकांत बाळू भोसले (२१), परमेश्वर राजेभाऊ शिंदे(२२), अभिषेक विनोद शाह(१९), विशाल रमेश राक्षे(२६), सत्यम दत्तात्रय कड (१९), समीर विलास कड(२०), रोहिदास काळूराम धनवटे (१९), विकास अंकुश नाईकवाडी (२८), सोहेल रफिक इनामदार (१९), प्रवीण उद्धव गावडे(२३), आकाश मारुती कड(२५), सचिन दिगंबर आमटे (२७), आनंद दिनेश मांदळे (१८), प्रसाद राजाराम खंडेभराड (१८) यांना अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पीआय मनोजकुमार यादव, एलसीबीचे पीआय दयानंद गावडे, पीएसआय महेश मुंडे, एपीआय प्रशांत पवार व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.
चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेत आणखी पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 8:45 PM
सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती.
ठळक मुद्देअटक आरोपींची एकूण संख्या तेवीस : चौकशीसाठी २० जण ताब्यात निरपराध तरुणांना चौकशी करून सोडले वाहनांची जाळपोळ , हिंसाचार फोटो, व्हिडीओ असल्यास ते चाकण पोलीस ठाण्यात जमा करून सहकार्य करण्याचे आवाहन