(स्टार १०९४ डमी)
पुणे : भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात फारसा काही फरक पडलेला नाही. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात तर सलग दोन दिवस सुटी आल्याने भाजीपाल्याचे दर निम्म्याने घटले होते. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना तर प्रचंड तोटा सहन करावा लागला.
एखादे पीक शेतकरी ३ ते ६ महिने किंवा ९ महिन्यांच्या कालावधीत घेत असतो. या काळात खुरपणी, खत, पाणी, वाहतूक आदी कारणांसाठी त्याचा भरमसाठ खर्च होत असतो. जेव्हा तो माल बाजारात विक्रीला घेऊन येतो. तेव्हा त्याच्याकडून किरकोळ व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करतात. त्यात त्याचा उत्पादन किंवा वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. याउलट व्यापारी मात्र, दुप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तसेच हमीभावाची देखील मागणी करत आहेत.
------
* कोणत्या भाजीला काय भाव
भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव
वांगी १२-१६ ४०
टोमॅटो २-४ २०
भेंडी १२-१६ ४०
चवळी १२-१६ ४०
पालक ४-६ १०
कोथिंबीर २-४ १०
मेथी ४-६ १०
हिरवी मिरची १५-२० ५०-६०
पत्ताकोबी ३-४ २०
फूलकोबी १०-१२ ४०
दोडके ८-१० ४०
-------
* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
१) कोथिंबीर लावली होती. तीन-चार महिन्याचा उत्पादन खर्च खूप होता. जेव्हा मार्केट यार्डात विक्रीसाठी आणली तेव्हा एका गड्डीला २ ते ४ रुपये दर मिळाला. त्यामुळे कोथिंबिरीचा उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नाही.
- संजय कदम, शेतकरी
----
२) दोन एकरांत कोबी लावली होती. मात्र, यंदा बाजारात कोबीला भावच नाही. पहिल्या तोड्याच्या वेळी बाजारा कोबी विक्रीला नेली. तेव्हा वाहतूक खर्चही पदरचा करावा लागला. त्यामुळे दोन एकरातील कोबी जनावरांना सोडली.
- शहाजी थोरात, शेतकरी
-----
* ग्राहकांना परवडेना...
शेतकऱ्यांकडून मार्केट यार्डातील बाजारात किरकोळ विक्रेत हे कवडीमोल भावात मालाची खरेदी करतात. मात्र, इतर ठिकाणी हे व्यापारी तिप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करत आहेत. होलसेल बाजारात शेतकऱ्यांकडून ३ ते ४ रुपये किलोने पत्ताकोबी घेऊन ती पुढे किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलोने किरकोळ व्यापारी विकत आहेत. आर्थिकदृष्ट्या ते आम्हाला परवडत नाही. त्यामुळे आम्ही सध्या भाजीपाला घेतच नाही.
- संगीता पठारे, ग्राहक
-----
* भावात एवढा फरक का?
मार्केट यार्डातून ३ रुपयाला १०० मेथीच्या जुडी घेतल्यावर त्या आणण्यासाठी वाहतूक खर्च लागतो. तसेच घेतलेल्या १०० जुड्यांमध्ये १० ते १५ जुड्या खराब निघतात. त्याचा खर्च भरून काढण्यासाठी आम्हाला साहजिकच दर वाढवावे लागतात. आमचा तो खर्च आणि काही प्रमाणात नफा या दृष्टीने आम्हाला दर वाढवावेच लागतात.
- हिरामण आल्हाट, किरकोळ व्यापारी