पुणे - कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन डीजेची तोडफोड करण्यास सांगत दगडफेक करून मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी कॉग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली. एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरु असताना कासेवाडीत दोन नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अविनाश बागवे, त्याचा पी.ए. अरुण गायकवाड, यासेर बागवे, विवेक उर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सूरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापू कसबे, गणेश जाधव, विठ्ठल थोरात, परेश गुरव, सुरज कांबळे, शिवाजी कांबळे तसेच इतर ४ कार्यकर्ते यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज अडसुळ (वय २७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : अडसुळ यांच्या अशोक तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक कासेवाडी येथून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जात होती. त्यावेळी बागवे यांनी त्याच्या मंडळाच्या कार्यकर्र्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका, असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर ट्रॅक्टर चालक सोमनाथ म्हस्के व साऊंड सिस्टिमचा मालक ओेंकार कोळी या दोघांना कार्यकर्त्यांनी हाताने मारहाण केली. पायातील चप्पल, बूट व दगडफेक केली. यात मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खडक पोलिसांनी वेळीच पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अटक केलेल्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
अविनाश बागवे यांच्यासह पाच जणांंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 2:12 AM